घाटकोपर पूर्वमधील SRA प्रकरणांसाठी विशेष जनजागृती शिबिर २ ऑगस्टला
आज, दिनांक 23 जुलै 2025 रोजी, घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) अंतर्गत येणाऱ्या विविध प्रलंबित प्रकरणांबाबत तसेच “एस.आर.ए. अभय योजना” संदर्भातील अडचणी, नागरिकांचे प्रश्न आणि पुढील कार्यवाही याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेतली.
या बैठकीत घाटकोपर पूर्व परिसरात विशेषतः झोपडपट्टीतील नागरिकांना योजना, दस्तऐवजीकरण आणि कायदेशीर अडचणीबाबत अधिकृत व स्पष्ट माहिती मिळावी, त्यांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी एक विशेष जनजागृती शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत गंधकुटी बुद्धविहार, रमाबाई कॉलनी, घाटकोपर पूर्व येथे “एस.आर.ए. अभय योजनेचे विशेष शिबिर” आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिरात पात्र नागरिकांना त्यांच्या पुनर्वसन प्रकरणांची स्थिती, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, शासकीय निर्णय, आणि प्रलंबित अर्जांविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून, शंका-समाधान आणि मार्गदर्शनासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरेल.
या उपक्रमाचा उद्देश नागरिकांची सुलभतेने पुनर्वसन प्रक्रियेतील अडथळे दूर करणे आणि शासनाच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हाच आहे.






